NVIDIA: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात झेपावणारी कंपनी

अमेरिकन चिपमेकर कंपनी एनव्हिडिया कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा पुरेपूर फायदा घेत आहे. एआय कॉम्प्युटिंगमध्ये जगातील आघाडीवर असलेल्या या कंपनीने गेल्या दोन वर्षांत अविश्वसनीय प्रगती केली आहे आणि अनेक नवीन विक्रम स्थापित केले आहेत. अलीकडेच अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आणि त्यांची किंमत रॉकेटच्या गतीने वाढली. यामुळे कंपनीचे मूल्य आता दोन ट्रिलियन डॉलर्सच्या जवळ पोहोचले आहे.

सर्वात महत्त्वाचा स्टॉक

गेल्या काही दिवसांपासून चिप उत्पादक कंपनी एनव्हिडिया सतत चर्चेत आहे. कंपनीच्या शेअरमधील तुफानी वाढ पाहून अमेरिकेतील आघाडीच्या वित्तीय सेवा कंपनी गोल्डमन सॅक्सच्या ट्रेडिंग डेस्कने एनव्हिडिया शेअरला पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा स्टॉक म्हटले आहे. चिप उत्पादक एनव्हिडियाने अलीकडेच गुगलसारख्या कंपनीला बाजार भांडवलाच्या बाबतीत मागे टाकले आहे. याशिवाय कंपनीच्या शेअरमधील तेजीमुळे अमेरिकन शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ॲमेझॉन आणि गूगलला मागे टाकले

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार एआय चिप निर्मात्या कंपनीने गेल्या वर्षी प्रचंड वाढ नोंदवली आणि २०२४ मध्ये नॅस्डॅक १०० इंडेक्सच्या एकूण वाढीच्या एक तृतीयांश वाढीसाठी एनव्हिडिया जबाबदार आहे. या महिन्यात कंपनीने आणखी एक टप्पा गाठला आणि मंगळवारी गूगलच्या अल्फाबेटला मागे टाकत जगातील चौथी सर्वाधिक बाजारपेठेची (मार्केट कॅपिटल) असलेली कंपनी बनण्याचा मान मिळवला. तसेच अमेरिकेतील तिसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली. कंपनीचे बाजार भांडवल १.७८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले.

एका दिवसात रिलायन्सच्या बरोबरीची कमाई

या तेजीच्या जोरावर एनव्हिडियाचे मार्केट कॅप बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स निर्देशांकच्या एकूण मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. CNBC च्या अहवालानुसार सध्या सेन्सेक्सचे मार्केट कॅप १.७६ ट्रिलियन डॉलर्स आहेत, तर एकटा एनव्हिडिआ १.९१ ट्रिलियन डॉलर्सचे मूल्य असलेली कंपनी बनली आहे. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे जिचे एकूण मूल्य सध्या २४२ अब्ज डॉलर नोंदवले गेले आहे. याचा अर्थ एनव्हिडियाने एका दिवसाच्या तेजीसह संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य जोडले आहे.